मोकाट गायीमुळे भातशेतीचे नुकसान; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
कोंडये तर्फे सौंदळ येथील घटना
राजापूर : दावणीला न बांधता मोकाट सोडलेल्या गायीने शेतात घुसून हाताशी आलेल्या पिकलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान केल्याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोंडये तर्फे सौंदळ येथील जुने गावठाण परिसरातील शेतात घडली असून एका वृद्ध शेतकरी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंडये तर्फे सौंदळ मधलीवाडी येथील रहिवासी शुभांगी तुकाराम शिवगण (वय ६१) या १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या गट क्रमांक ६८ मधील शेतात भाताची कापणी व झोडणी करत होत्या. त्याच वेळी गावातील किशोर गणपत शिवगण (वय ५०) यांच्या मालकीची गाय दावणीला न बांधता तसेच राखणीसाठी कोणीही माणूस न ठेवता मोकाट सोडण्यात आली होती.
या मोकाट गायीने शुभांगी शिवगण यांच्या पिकलेल्या भातशेतीत घुसून उभे पीक फस्त करत पायाखाली तुडवून मोठ्या प्रमाणावर नासाडी केली. वर्षभराच्या कष्टाने पिकवलेल्या भाताचे नुकसान झाल्याने शुभांगी शिवगण यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित किशोर शिवगण यांच्याविरुद्ध नुकसान केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.