खेड शिव बुद्रुक मोहल्ल्यात घरफोडी
बंद घरे फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास; खेड पोलिसांत गुन्हा दाखल
खेड: तालुक्यातील शिव बुद्रुक मोहल्ला येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप व कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने कापून घरात प्रवेश करत तब्बल १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या पूर्वी घडली असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अहमद महम्मद परकार (वय ५६, रा. शिव बुद्रुक मोहल्ला, ता. खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी परकार यांचे मावस भाऊ आणि शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोयंडा व लॉक हत्याराने कापून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले दागिने, रोख रक्कम आणि घरगुती साहित्य चोरून नेले.
४५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन, २७ हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी २ ग्रॅम) आणि ३३ हजार ७५० रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या पुळ्यांचे तीन जोड (प्रत्येकी २.५ ग्रॅम), रोख रक्कम व इतर साहित्य : ५ हजार रुपये रोख रक्कम, ३० हजार रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या तीन इन्व्हर्टर बॅटरी, ५ हजार रुपये किमतीची तांब्याची व ॲल्युमिनियमची आठ भांडी आणि १ हजार ५०० रुपये किमतीचा एच.पी. कंपनीचा गॅस सिलेंडर असा एकू १,४२,२५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ३६१/२०२६) नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.