एस.टी. बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दापोली-मंडणगड रोडवर अपघात; चालकावर गुन्हा दाखल
दापोली (प्रतिनिधी): दापोली ते मंडणगड रोडवरील खेर्डी कातळवाडी येथे एस.टी. बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस.टी. बस चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास खेर्डी कातळवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार नितीन कालेकर (वय २८ वर्षे, रा. करंजाणी उगवतवाडी, ता. दापोली) हे आपल्या ज्युपिटर दुचाकीवरून (क्र. MH-08-BJ-0833) जालगाव येथून करंजाणी येथील घरी जात होते. ते खेर्डी कातळवाडी येथे आले असता, मंडणगडवरून दापोलीकडे येणारी एस.टी. बस (क्र. MH-14-BT-2504) आरोपी चालक भारत नाथा भवार (वय ४७ वर्षे, मूळ रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर; सध्या मंडणगड डेपो, ता. मंडणगड) हा भरधाव वेगात व रस्त्याच्या मध्यभागातून धोकादायक स्थितीत चालवत होता.
यावेळी फिर्यादीच्या पुढे जाणारे युनिकॉन दुचाकीस्वार (क्र. MH-08-BA-9978) सुरेंद्र शांताराम गोरीवले (वय ४५ वर्षे, रा. काळकाईकोड, ता. दापोली) हे दुचाकीसह रस्त्यावर स्लिप होऊन पडले. त्याच वेळी एस.टी. बस त्यांच्या अंगावरून गेल्याने ते बसच्या खालच्या भागातील हौसिंगमध्ये अडकून पडले. या अपघातात गोरीवले यांच्या डोक्याला, कंबरेला तसेच हात-पायांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच फिर्यादीच्या ज्युपिटर दुचाकीचेही नुकसान झाले.
याप्रकरणी ओंकार नितीन कालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजता गु.र.नं. २५४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार एस.टी. चालक भारत नाथा भवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.