एकादशी, सुट्टीच्या दिवशीही माणुसकीचे दर्शन
नगरसेवक अमित विलणकर यांचा वॉर्डबाहेरील घटनेतही पुढाकार; नगरपरिषद कर्मचाऱ्यांची तत्परता कौतुकास्पद
रत्नागिरी (प्रतिनिधी) :
शहरातील जयस्तंभ परिसरात एका बेवारस गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सणासुदीचा आणि सुट्टीचा दिवस असूनही प्रभाग क्र. १५ चे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांनी तातडीने पुढाकार घेत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत गाईची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यतत्परतेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
जयस्तंभ परिसरात एक बेवारस गाय मृत अवस्थेत पडल्याची माहिती नगरसेवक अमित विलणकर यांना मिळाली. वास्तविक, हा परिसर त्यांच्या प्रभाग कार्यक्षेत्राबाहेरील आहे. मात्र, प्रभागाच्या सीमांचा विचार न करता, केवळ सामाजिक बांधिलकीतून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नगरपरिषदेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला.
एकादशीचा सण आणि सुट्टीचा दिवस असतानाही नगरपरिषदेचे कर्मचारी विवेक सावंत आणि जेसीबी चालक अर्जुन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत गाईचे शव हटविण्याचे काम पूर्ण केले. मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी मृत जनावर पडून राहिल्यास परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र, नगरसेवक विलणकर यांची तत्परता आणि कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
लोकप्रतिनिधी म्हणून केवळ स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहराच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याच्या अमित विलणकर यांच्या वृत्तीचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. तसेच, सणाच्या दिवशीही जनहितासाठी कर्तव्य बजावणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचेही आभार मानले जात आहेत.