दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणाला मारहाण ; साक्षीदारालाही धमकी
रत्नागिरी, ता. १६ : दुचाकी गाडी दिली नसल्याच्या रागातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना आठवडा बाजार परिसरात देशी बारसमोर घडली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक राठोड (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष भोजू राठोड (वय ४१, व्यवसाय नोकरी, सध्या रा. राहताघर, एसटी स्टँड, रत्नागिरी; मूळ रा. मुळगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) हे या घटनेत जखमी झाले आहेत. संशयित दीपक राठोड याला फिर्यादी यांनी दुचाकी दिली नाही या रागातून त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर लाकडी काठीने मारहाण केली. तसेच, ‘तू ड्युटी कशी करतोस, ते बघतो,’ असे म्हणत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय, रस्त्यावर उभी केलेली गाडी लाथ मारून नुकसान केले. तसेच, या घटनेतील साक्षीदारालाही फोन करून धमकी दिली. या प्रकरणी संतोष राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.