खेडशी परिसरात जखमी बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू; पुढील उपचारासाठी पुण्याला रवाना
रत्नागिरी:- मौजे खेडशी येथील चांद-सूर्या आणि मलुष्टे यांच्या आंबाबागेसमोरील रस्त्यावर शुक्रवारी जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचे वन विभागाच्या पथकाने सुरक्षित रेस्क्यू केले. प्राथमिक उपचारानंतर या बिबट्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
हातखंबा येथील रहिवासी श्री. निरंजन जठार यांनी रस्त्यावर जखमी बिबट्या दिसल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वन विभागाला दिली. माहिती मिळताच वरिष्ठांना कळवून पथकाने तातडीने रेस्क्यू साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान बिबट्या जखमी असल्याचे स्पष्ट झाले.
काही वेळानंतर हा बिबट्या लंगडत व अडखळत पुढे जात असल्याने थेट रेस्क्यू करणे धोकादायक ठरू शकत होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन रत्नागिरीचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने ‘डार्ट गन’च्या सहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले आणि पिंजऱ्यात बंदिस्त केले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी करून पुढील आवश्यक उपचारांसाठी त्याला पुण्यातील रेस्क्यू सेंटरकडे रवाना केले.
बचाव मोहिमेत यांचा सहभाग
ही मोहीम विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. रेस्क्यू दरम्यान रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, पशुवैद्यकीय अधिकारी स्वरूप काळे, देवरुखचे वनपाल सागर गोसावी, पालीचे वनपाल रत्नराज गायकवाड, वनरक्षक सहयोग कराडे (साखरपा), आकाश कडूकर (फुणगुस), श्रीमती शर्वरी कदम (जाकादेवी), विराज संसारे (रत्नागिरी) तसेच आरआरटी पथकातील महेश धोत्रे व ईशान खानोलकर उपस्थित होते.