रत्नागिरीच्या जैवविविधतेत मोलाची भर; जिल्ह्यात प्रथमच ‘राखी डोक्याच्या बुलबुल’ची नोंद
राजापूर : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पक्षिवैभवात आणखी एका दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याची भर पडली असून, जिल्ह्यातून प्रथमच ‘राखी डोक्याचा बुलबुल’ या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात पक्षीनिरीक्षक श्रीकृष्ण मगदूम यांना या पक्ष्याचे दर्शन घडल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नोंद झालेल्या पक्ष्यांची संख्या आता ३६७ वर पोहोचली आहे.
आजवर रत्नागिरी जिल्ह्यातून ३६६ पक्ष्यांची अधिकृत नोंद करण्यात आली होती, ज्यामध्ये आता या नव्या पाहुण्याची भर पडली आहे. जगात केवळ पश्चिम घाटातच आढळणारा हा स्थानिक निवासी पक्षी यापूर्वी महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून गोवा, कर्नाटक आणि केरळपर्यंतच्या प्रदेशात नोंदवला गेला होता; मात्र राजापूर तालुक्यातील या दर्शनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील त्याची ही पहिलीच ऐतिहासिक नोंद ठरली आहे. प्रामुख्याने हिरवट ऑलिव्ह रंगाचे शरीर, राखाडी रंगाचे डोके, मानेचा मागील भाग व गळा, कपाळावर पिवळसर हिरवी छटा, फिकट निळसर पांढरे डोळे आणि करड्या-हिरव्या रंगाची चोच अशी या पक्ष्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असून, डोक्यावरील राखाडी रंगामुळेच त्याला ‘राखी डोक्याचा बुलबुल’ हे नाव पडले आहे.
स्थलांतरित नसलेला हा पक्षी प्रामुख्याने सदाहरित जंगलांमधील बांबूची बेटे, दाट झाडाझुडपे आणि फळझाडांमध्ये वावरतो, तर विविध जंगली फळे, बेरी आणि लहान कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. साधारणपणे मार्च ते जुलै हा त्याचा प्रजननाचा काळ असतो. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२५’ च्या अहवालानुसार या पक्ष्याचा जागतिक संवर्धन दर्जा ‘लीस्ट कन्सर्न’ (Least Concern) असा असला आणि भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या अनुसूची दोनमध्ये त्याचा समावेश असला, तरी मर्यादित भौगोलिक क्षेत्र आणि जंगलांवरील त्याचे अवलंबित्व लक्षात घेता या पक्ष्याच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.