केळवत घाटात कारची दुचाकीला जोरदार धडक
तिघेजण जखमी, पुण्यातील चालकावर गुन्हा दाखल
मंडणगड: तालुक्यातील केळवत घाटाच्या उतारावरील अवघड वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव मारुती ब्रीझा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालघर (ता. मंडणगड) येथील मेहबुब नबीसाब मुल्ला (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात पुणे येथील कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अपघाताची घटना दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याबाबत दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.२१ वाजता पोलिसांत अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी मेहबुब मुल्ला यांचा भाऊ राजु नबीसाब मुल्ला (वय ५२, रा. पालघर, ता. मंडणगड) हे आपल्याकडे कामाला असलेले कामगार देवकुमार मेहलाल खैरवाल (वय २७, सध्या रा. महाड, जि. रायगड, मूळ रा. मुड्यार, ता. मजगवा, जि. मध्यप्रदेश) आणि जैमुद्दीन आनु शेख (वय ४२, रा. सौमित्रनगर, बायपास, मुंब्रा, जि. ठाणे) यांना सोबत घेऊन आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच. ०८ एक्स ७३५७) मंडणगडच्या दिशेने येत होते. ते केळवत घाटाच्या उतारावरील वळणावर आले असता, समोरून आशुतोष अशोक पंढरपुरकर (वय ५४, रा. उजवी भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) हे आपल्या ताब्यातील मारुती ब्रीझा कार (क्र. एम.एच. १२ झेड एस ५२४७) घेऊन येत होते. यावेळी कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या धडकेत दुचाकीस्वार राजु मुल्ला यांच्यासह दोन्ही कामगार देवकुमार खैरवाल आणि जैमुद्दीन शेख यांना लहान-मोठ्या व गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी आरोपी चालक आशुतोष अशोक पंढरपुरकर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.