स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पतीसह नोकराचाही जामीन फेटाळला
चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात ; ४१ साक्षीदारांची तपासणी बाकी, तरी न्यायालयाचा दिलासा नाकारला
रत्नागिरी, : स्वप्नाली शिर्के हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पती सुकांत गजानन सावंत आणि त्याचा कथित साथीदार तथा नोकर प्रमोद ऊर्फ पम्या बाबू गवणंग यांचे जामीन अर्ज रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी शनिवारी (ता.७) नोव्हेंबर ला दोन्ही आरोपींचे स्वतंत्र जामीन अर्ज नामंजूर केले. त्यामुळे चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या दोघांचाही मुक्काम कायम राहणार आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात खून, पुरावा नष्ट करणे आणि कट रचणे या कलमांखाली गुन्हा दाखल आहे. कौटुंबिक वादातून स्वप्नालीचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह जाळून त्याची राख समुद्रात फेकण्यात आली, असा आरोप आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बचाव पक्षाने खटल्याच्या संथ गतीचा मुद्दा उपस्थित केला. एकूण ५९ साक्षीदारांपैकी केवळ १८ जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून ४१ साक्षीदारांची तपासणी बाकी आहे. आरोपींना दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
मात्र, पती सुकांत सावंतविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या दहा गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मृत स्वप्नालीने त्याच्याविरोधात केलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या तक्रारीचा प्रलंबित खटला सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडला. उर्वरित साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.
दुसरा आरोपी प्रमोद रावणंग याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याच्या माहितीवरून हाडांचे अवशेष आणि राख मिळाल्याची बाब तसेच डीएनए अहवालातून दाव्याला मिळालेली पुष्टी विचारात घेतली. दोन्ही आरोपींच्या प्रकरणातील परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन नाकारला. हा जामीन अर्जावरील निर्णय असून खटल्यातील अंतिम दोषसिद्धीचा निर्णय अद्याप झालेला नाही.