नाणार इंगळवाडी चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान मंजूर
रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील मौजे नाणार इंगळवाडी येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ४ शालेय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने’अंतर्गत तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. प्रती विद्यार्थी रुपये १ लाख ५० हजार याप्रमाणे हे सानुग्रह अनुदान जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नाणार इंगळवाडी येथील घटनेत प्राण गमावलेल्या या शाळकरी विद्यार्थ्यांच्या वारसांना शासकीय योजनेतून तातडीने आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १.५० लक्ष रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
हे सानुग्रह अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडे लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहे.