चिपळूण पोलिसांचा वाशिष्ठी नदीकिनारी छापा
हातभट्टी उद्ध्वस्त करत दीड लाखांचे दारू व रसायन नष्ट
चिपळूण :
तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर चिपळूण पोलिसांनी धडक कारवाई करत ती उद्ध्वस्त केली आहे. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी सुमारे १ लाख ४८ हजार ९५० रुपयांचे गुळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन, तयार हातभट्टी दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी एकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद सहदेव आंबेरकर व त्यांच्या पथकाला वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी असलेल्या झाडीझुडपांच्या आडोशाला बेकायदेशीर हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी अचानक छापा टाकला. त्यावेळी सूरज मधुकर चव्हाण (वय ३२, रा. वालोपे गणेशवाडी, ता. चिपळूण) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिगरपरवाना गावठी दारू गाळताना रंगेहात मिळून आला.
पोलिसांनी घटनास्थळाची पंचांसमक्ष पाहणी केली असता, सुमारे ५ हजार ७५० रुपये किमतीचे उकळते रसायन असलेला २०० लिटरचा पत्र्याचा पिंप, टाक्या व बॅरलमध्ये भरलेले १८०० लिटर कुजके रसायन आणि २१ लिटर तयार गावठी दारू असलेला कॅन आढळून आला. याव्यतिरिक्त लगतच्या झुडपांमध्ये शोध घेतला असता प्रत्येकी ५०० लिटर क्षमतेच्या चार प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले २००० लिटर गुळ-नवसागर मिश्रित रसायन सापडले. आरोपीने चौकशीदरम्यान हा सर्व दारू निर्मितीचा साठा आपलाच असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जागेवरच जप्त करून नष्ट केला असून, पोलीस हवालदार विनोद आंबेरकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सूरज चव्हाण याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीकिनारी सुरू असलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.