पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा
गांजा ओढत असल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती
लांजा: मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून खोटी माहिती देणे लांजा येथील एका तरुणाला चांगलेच अंगलट आले असून, पोलिसांची नाहक धावपळ उडवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील रवी राठोड (वय २७, रा. गोसावी चाळ, आग्रे हॉलजवळ, लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील आग्रे हॉलनजीक असलेल्या फ्रेंड्स बिअर शॉपीजवळ दोघे-तिघे जण गांजा सेवन करीत असल्याची माहिती ‘डायल ११२’ या क्रमांकावर देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे लांजा पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले; परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे गांजा सेवन करणारी कोणतीही संशयित व्यक्ती अथवा प्रकार पोलिसांना आढळून आला नाही.
दरम्यान, घटनास्थळावरच तक्रार करणारा सुनील राठोड हा पोलिसांना आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली असता, त्याने मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन केल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी कोणतीही संशयास्पद व्यक्ती नसताना आणि माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे माहीत असतानाही, राठोड याने पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या गैरकृत्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८४ सह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २१७ (ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल पी. ए. कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.