मठ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर
लांजा :
जावडे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या मठ उपकेंद्रात ‘माझं गाव-आरोग्यसंपन्न गाव’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री भवानी सोमेश्वर विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत मठ, आरोग्य उपकेंद्र मठ आणि श्री स्वामी समर्थ रक्तपेढी डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, पंचायत समिती सदस्या दीपाली साळवी, विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी दिवाकर गुणे, सुभाष पवार आणि संतोष अडबल यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्रामस्थांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ईसीजी आणि महिलांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत विशेष तपासणीचा समावेश होता.
कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री हेडाऊ, आरोग्य सहाय्यक आझाद विचारे, ग्रामसेवक समीर गमरे, माजी सरपंच वैष्णवी साळवी यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कांबळे यांनी केले, तर आझाद विचारे यांनी आभार मानले. जावडे प्राथमिक आरोग्य केंद्र व मठ उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शिबिराचे नियोजन केले.