श्रावणी प्रभुमहाजन हिचा ‘कॅम्पस से संसद’ उपक्रमात सहभाग
रत्नागिरी : नवी दिल्ली येथे आयोजित ‘कॅम्पस से संसद’ या उपक्रमात गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी श्रावणी प्रभुमहाजन सहभागी झाली. युवकवर्गात लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, त्यांच्यातील विविध कौशल्य विकसन व्हावे आणि भविष्यात राष्ट्रबांधणीत तरुणांचा सहभाग वाढावा, या हेतूने राज्यसभा खासदार आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे व विद्यार्थी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.
या अभ्यास दौऱ्यासाठी लेखी परीक्षा, मुलाखत अशा दोन टप्प्यांमधून महाराष्ट्र राज्यातून ३१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय संसद, राष्ट्रपती भवन तसेच नवी दिल्लीतील विविध ऐतिहासिक वारसास्थळे व संशोधन संस्थांना भेटी दिल्या. केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी घेऊन देशासमोरील प्रश्न, विविध समकालीन घडामोडी यावर विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्यावतीने एक अभ्यास कीट, प्रमाणपत्र देण्यात आले.
या उपक्रमाचे समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख नीलेश पाटील यांनी काम पाहिले. तसेच सहभागासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे, इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे, डॉ. सीमा वीर, प्रा. अक्षय झोरे, कार्यालयीन कर्मचारी, पालक आदींनी मार्गदर्शन केले.
श्रावणीचे अभिनंदन र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. सीमा कदम यांनी अभिनंदन केले.