मंडणगड-वेळास एसटी बसला अपघात
३ महिला जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:
मंडणगडहून वेळासच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा मालेगावजवळ अपघात झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला बाजू देताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या साईसावली फार्महाउसच्या संरक्षक भिंतीवर आदळली. या अपघातात बसमधील तीन महिला प्रवासी जखमी झाल्या असून, बस आणि फार्महाउसच्या भिंतीचेही नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २६६३ मंडणगडहून वेळासच्या दिशेने जात होती. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मालेगाव एसटी बसथांब्याजवळील साईसावली फार्महाउससमोर बस आली असता, समोरून वेळासच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला बाजू देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती फार्महाउसच्या संरक्षक भिंतीला धडकली. चालकाने बस हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अपघातात प्रवीणा प्रवीण मयेकर (वय ४१, रा. वेळास), प्रेरणा सचिन सातवी (वय ४०, रा. शिपोळेगाव) आणि प्रियांका गणेश कदम (वय ५३, रा. वेरळ, तर्फ वेसवी) या तीन महिला प्रवाशांना मार लागून किरकोळ दुखापती झाल्या. अपघातामुळे एसटी बसचे तसेच फार्महाउसच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.
या प्रकरणी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दत्ता धाकल्या पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी चालक मंगेश नरहरी वाघमारे (वय ३५, सध्या रा. एसटी डेपो, मंडणगड; मूळ रा. यवतमाळ जिल्हा) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.