वेसवी येथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या संशयितावर बाणकोट पोलिसांची कारवाई
मंडणगड: तालुक्यातील वेसवी येथील मोरे यांच्या टपरीच्या आडोशाला अंधारात संशयास्पद हालचाली करणाऱ्या आणि पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका इसमाला बाणकोट सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतरच्या वेळेत स्वतःचे अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सोमई परमालिक प्रसाद (वय ४४, मूळ रा. देवगह, पोस्ट अरजी, तहसील बासी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. बाणकोट, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई समीर संपत गावडे व पोलीस पथक गस्तीवर असताना वेसवी येथील मोरे यांच्या टपरीच्या आडोशाला अंधारात एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांना पाहताच तो घाईघाईने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. सुर्यास्त व सूर्योदय दरम्यानच्या वेळेत स्वतःचे अस्तित्व लपवून कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हा इसम अंधारात दबा धरून बसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.