कुवे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; प्रौढाचा मृत्यू, दुसरा गंभीर
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात मनोहर सिताराम गुरव (वय ५४, रा. वनगुळे, गुरववाडी, ता. लांजा) यांचा मृत्यू झाला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वारावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनोहर गुरव हे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मेस्ट्रो दुचाकीने (क्र. एम.एच.०८.ए.सी.१८८९) मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळे गावाकडे जात होते. ते कुवे पुरागाव येथे आले असता, त्यांच्या मागून गोवा दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या डिओ मोटारसायकलने (क्र.एम.एच.०८. ए.एम. ९२२७) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि अतिवेगात वाहन चालवून ही धडक दिल्याने मनोहर गुरव हे रस्त्यावर फेकले गेले. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या अपघाताप्रकरणी मयताचे जावई सुहास सखाराम भोवड (वय ३४, सध्या रा. वनगुळे, मूळ रा. डोंबिवली) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून डिओ चालक प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघातात संशयित आरोपी प्रथमेश करंबळे हादेखील जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.