बोर्ड परीक्षा म्हणजे बागुलबुवा नाही! ‘सूत्रबद्ध नियोजन’ ठरले विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ
कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचा आश्वासक उपक्रम; ५ जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद
रत्नागिरी: शालेय जीवनातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा जसजशा जवळ येतात, तसतशी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात एक अनामिक भीती घर करू लागते. अभ्यासाचा ताण, नातेवाइकांची अपेक्षा आणि निकालाची चिंता यामुळे कोवळ्या मनांवर पडणारा भार हलका करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने एक अत्यंत आश्वासक पाऊल उचलले आहे. ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या विशेष उपक्रमांतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांशी थेट ऑनलाईन संवादाचा सेतू बांधण्यात आला.
सत्राची सुरुवात करताना कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीवर फुंकर घातली. “बोर्डाची परीक्षा हा कोणताही बागुलबुवा नसून स्वतःमधील क्षमता ओळखण्याची एक सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, निरोगी शरीर आणि शांत मन यांची अचूक सांगड घातल्यास यशाचे शिखर गाठणे सोपे जाते,” असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. या प्रसंगी कोल्हापूर मंडळाचे सचिव गजानन उकिरडे, कोकण मंडळाच्या सचिव पुनीता गुरव यांच्यासह दोन्ही विभागांतील शिक्षण अधिकारी व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनुभवी शिक्षक श्रीराम टेके यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा शास्त्रशुद्ध आराखडा समजावून सांगितला. डोळे झाकून पुस्तके वाचण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी सोपे, मध्यम आणि कठीण विषयांचे वर्गीकरण करून कठीण विषयांना रोज अधिक वेळ द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक विषयाची एक स्वतंत्र छोटी ‘नोंदवही’ करून त्यात महत्त्वाची सूत्रे, व्याख्या आणि आकृत्या लिहून ठेवाव्यात. परीक्षेच्या आदल्या रात्री संपूर्ण पुस्तक चाळण्याऐवजी ही छोटी वही वाचल्यास ताण तात्काळ ओसरतो. तसेच, सलग अभ्यासाऐवजी ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटांची विश्रांती घ्यावी आणि डिसेंबर-जानेवारी महिन्यात घड्याळ लावून जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, असे त्यांनी सांगितले.
प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि मॅराथॉन धावपटू डॉ. राहुल फासे यांनी तंदुरुस्त शरीराचे महत्त्व पटवून दिले. “शरीर ही अभ्यासाची गाडी असून आहार हे तिचे इंधन आहे,” असे सांगत त्यांनी भिजवलेले बदाम, अक्रोड, केळी, दूध आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला. रात्री झोपण्यापूर्वी व जेवताना मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळावा आणि अभ्यासादरम्यान डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी ‘२०-२०-२०’ च्या नियमाचे पालन करावे. रात्री साडेदहा ते पहाटे साडेपाच ही झोपेची सर्वोत्तम वेळ असून विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
‘अप्पू’ बना; ताणतणावाला हद्दपार करा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कपिल लळीत यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर मार्गदर्शन केले. अतिताण घेणारा ‘मगू’ आणि गाफील राहणारा ‘निकू’ न बनता, दररोज नियमित अभ्यास करणारा आणि शिक्षकांची मदत घेणारा ‘अप्पू’ बनून यशाचे मानकरी व्हा, असे आवाहन त्यांनी केले. भीती वाटल्यास त्वरित थांबून दीर्घ श्वास घ्यावा. आपण वाचलेला भाग बंद करून दुसऱ्याला सोप्या भाषेत समजावून सांगणे हीच खरी उजळणी असून मुलांनी कोणाशीही तुलना न करता स्वतःच्या कालच्या प्रगतीशी स्पर्धा करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचा समारोप करताना मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी आभार मानले. दोन तास चाललेल्या या अभ्यासपूर्ण संवादाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भीतीचे सावट पूर्णपणे पुसून टाकले आणि त्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा नवा मार्ग दाखवला.