जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन: आस्था सोशल फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
रत्नागिरी:
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिना’चे (World White Cane Safety Day) औचित्य साधून रत्नागिरीतील दिव्यांगांच्या कल्याणासाठी समर्पित असणाऱ्या ‘आस्था सोशल फाउंडेशन’च्या वतीने रत्नागिरीचे मा. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
अंध आणि अल्पदृष्टी असणाऱ्या दिव्यांगांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अंध दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आस्था फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या निवेदनाद्वारे अंध दिव्यांगांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, जिल्ह्यात त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू करणे, परीक्षांच्या वेळी भेडसावणारी रायटरची समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र ‘रीडर-रायटर पॅनल’ची निर्मिती करणे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी सुगम्य व अडथळामुक्त परिसर (Accessible Environment) तयार करणे अशा विविध महत्त्वाच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
हे निवेदन देण्यासाठी आस्था सोशल फाउंडेशनच्या सचिव श्रीमती सुरेखा पाथरे यांच्या नेतृत्वाखाली अंध दिव्यांग प्रतिनिधी यश देवरुखकर, मोहंमद गडकरी, मोहंमद गौस शेख यांच्यासह दिव्यांगांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेटीदरम्यान मा. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आस्था फाउंडेशनच्या प्रतिनिधींचे आणि अंध दिव्यांगांचे म्हणणे अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतले. अंध दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्या रास्त असून प्रशासनाकडून या सर्व विषयांवर सकारात्मक पावले उचलली जातील, तसेच जिल्हा प्रशासनाकडून अंध दिव्यांगांच्या हितासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासक उद्गार मा. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी काढले.