अंजनवेल येथे समुद्रात पडून तरुणाचा मृत्यू
गुहागर : अंजनवेल येथील कोकण एल.एन.जी. कंपनीच्या जेटीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ब्रेक वॉटरलगत उभ्या असलेल्या टग जहाजावरून समुद्रात पडून एका २२ वर्षीय परप्रांतीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल कुमार लालसाहेब यादव (वय २२, रा. शरीफपूर, शिखिखुर्द, ता. हंडीया, जि. प्रयागराज, राज्य उत्तर प्रदेश) असे समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत राहुल कुमार यादव हा ओशन स्पार्कल लिमिटेड कंपनीच्या ‘ओशन स्वान १’ या जहाजावर २३ सप्टेंबर २०२६ पासून ट्रेनी डेक रेटिंग (क्रू) म्हणून कामाला होता. १० ऑक्टोबर रोजी ‘एल.एन.जी.सी. गॅस पोलारिस’ नावाचे गॅस वाहतूक करणारे मोठे जहाज जेटीवर आले होते. या जहाजाला जेटीपासून तीन नॉटिकल मैल अंतरावरून सुरक्षितपणे जेटीवर आणण्यासाठी आणि दिशा दाखवण्यासाठी ‘ओशन स्वान १’ या जहाजाने साहाय्य केले. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हे काम पूर्ण झाल्यानंतर ओशन स्वान जहाज जेटीपासून काही अंतरावर असणाऱ्या ब्रेक वॉटरजवळ अँकर टाकून थांबले होते.
दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास जहाजावरील टग मास्टर शाहरुख हिशामुद्दीन हुसेन हे जेवण करून विश्रांतीसाठी आपल्या खोलीत गेले असता, अवघ्या पाच मिनिटांत जहाजावरील सहकारी सनी मसिह याने ओरडत येऊन राहुल कुमार हा समुद्रात पडल्याची माहिती दिली. तसेच त्याचा मोबाईल जहाजाच्या डेकवर पडून असल्याचे सांगितले. तातडीने डेकवर धाव घेऊन पाहिले असता राहुल कुमार हा जहाजापासून काही अंतरावर पाण्यात उताण्या स्थितीत तरंगताना दिसून आला. जहाजावरील फर्स्ट मास्टर जयशंकर शर्मा यांनी तातडीने जेटी कंट्रोल आणि सुरक्षा स्पीड बोटीला बिनतारी संदेशाद्वारे (व्हीएचएफ) पाचारण केले. स्पीड बोटीच्या साहाय्याने राहुल कुमार याला तातडीने समुद्राबाहेर काढून मटेरियल जेटीवर आणण्यात आले आणि तेथून रुग्णवाहिकेद्वारे आर.जी.पी.पी.एल. मेडिकल सेंटर अंजनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक यांनी दुपारी १.५७ वाजता त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती जहाजावरील टग मास्टर शाहरुख हुसेन यांनी दिल्यानंतर गुहागर पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२६ अशी नोंद केली असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.