रत्नागिरीत तंबाखू विक्रीवर आरोग्य विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
१६ टपरीधारकांवर दंडात्मक कारवाई; भरारी पथकाची धडक मोहीम
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
सार्वजनिक ठिकाणी सर्रास होणारे धूम्रपान, शाळा व महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात होणारी तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि अन्न व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टपरीधारकांवर अखेर आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाने १४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरात धडक मोहीम राबवून ‘सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा’ अन्वये १६ टपरीधारकांवर दंडात्मक कारवाई केली. आरोग्य विभागाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नियमबाह्य तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
ही धडक कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धूम्रपानाला आळा घालणे, अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यातून वाचवणे, शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री रोखणे आणि तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर नियंत्रण आणणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
’कोटपा’ कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कलम २१ अन्वये २०० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जाहिरात केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंड; तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास सक्त मनाई आहे.
कारवाईत सहभागी झालेले पथक
या मोहिमेमध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अन्नसुरक्षा अधिकारी तृप्ती घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अनिल गुंजे, शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार रश्मी वायंगणकर आणि होमगार्ड मयूर पाडावकर यांच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.
आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात यापुढेही अशाच प्रकारची धडक मोहीम सुरूच राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई केली जाईल.
”तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होतात. नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये. तसेच व्यापाऱ्यांनी ‘कोटपा’ कायद्याचे काटेकोर पालन करावे, अन्यथा पुढील काळात अधिक कठोर कारवाई केली जाईल.”
— डॉ. भास्कर जगताप (जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी)