पाच दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर चौथ्या मुलीचा मृतदेह सापडला
राजापूर तालुक्यातील इंगळवाडी दुर्घटना: परिसरावर शोककळा
राजापूर:
तालुक्यातील इंगळवाडी येथे रविवारी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार बालकांपैकी बेपत्ता असलेल्या माहिरा या चौथ्या बालिकेचा मृतदेह चार दिवसांनंतर अखेर सापडला आहे. नानार आणि इंगळवाडी परिसरातील स्थानिक मच्छीमार बांधव, ग्रामस्थ आणि प्रशासनाने दिवस-रात्र राबवलेल्या शोधमोहिमेला गुरुवारी सकाळी यश आले. या घटनेमुळे संपूर्ण खाडीपट्ट्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तीन मुलांचे मृतदेह तत्काळ मिळाले, माहिराचा शोध सुरूच होता.
रविवारी घडलेल्या या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि यंत्रणेने तातडीने धाव घेत तीन बालकांचे मृतदेह शोधून बाहेर काढले होते. मात्र, माहिरा ही मुलगी पाण्यात वाहून गेल्याने तिचा सुगावा लागत नव्हता. खाडी आणि समुद्राचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेता शोधकार्यात मोठे अडथळे येत होते.
हेलिकॉप्टर, कोस्टल गार्डचे ड्रोन, स्कूबा डायव्हर्स पाचारण
या शोधमोहिमेवर जिल्हा आणि तालुका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सुरुवातीपासून तळ ठोकून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. तसेच राजापूरचे प्रांताधिकारी विश्वजीत दाभाडे हे सातत्याने या शोधमोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत राजापूर तहसीलदार आणि महसूल विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी मदतकार्यावर पूर्ण लक्ष ठेवून होते.
प्रशासनाकडून शोधमोहिमेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते, खाडीच्या खोल पात्रात शोध घेण्यासाठी स्कूबा डायव्हर्सना पाचारण करण्यात आले, तसेच कोस्टल गार्डच्या अत्याधुनिक ड्रोनचाही शोधकार्यात वापर करण्यात आला. चार दिवस शोध घेऊनही मृतदेह हाती लागत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि विनंतीनुसार एनडीआरएफच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र, सकाळीच मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्याने चिपळूण येथील कुंभारली येथूनच एनडीआरएफच्या पथकाला माघारी पाठवण्यात आले.
मच्छीमारांनी चार दिवस बंद ठेवला व्यवसाय;
लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा
या शोधमोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंगळवाडी आणि नानार परिसरातील स्थानिक मच्छीमार बांधवांनी दाखवलेली माणुसकी आणि एकजूट. स्थानिकांनी आपला मुख्य उदरनिर्वाहाचा असलेला मासेमारी व्यवसाय सलग चार ते पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवून अहोरात्र या शोधकार्यात झोकून दिले होते. राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना मदतकार्यात पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. स्वतः अपूर्वताई सामंत यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू हे दररोज घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना सहकार्य करत होते.
कांदळवनात अडकलेला आढळला मृतदेह
आज सकाळी ८:३० च्या सुमारास स्थानिक मच्छीमार छोट्या होडीतून कांदळवनाच्या भागात शोध घेत होते. त्यादरम्यान अचानक उग्र दुर्गंधी आल्याने त्यांनी चिपीच्या झाडांमध्ये बारकाईने तपास केला असता, माहिराचा मृतदेह कांदळवनात अडकल्याचे निदर्शनास आले. समुद्र आणि खाडीचे पात्र मोठे असल्याने शोधमोहीम प्रामुख्याने खालच्या भागात सुरू होती, परंतु समुद्राच्या उधाणाच्या भरतीमुळे मृतदेह प्रवाहाबरोबर वरच्या बाजूला गेला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
स्थानिक ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आला. त्यानंतर डॉ. कामले यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. धार्मिक विधी पूर्ण करून अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निष्पाप बालकांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण राजापूर तालुक्यात तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.