संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशाचा आयफोन लंपास
संगमेश्वर: मुंबईहून कोकणात येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशाचा ६४ हजार रुपये किमतीचा महागडा आयफोन अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना संगमेश्वर एसटी स्टँड परिसरात घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरीवली (पश्चिम) येथील रहिवासी रवींद्र दिनकर वैद्य (वय ५४) हे नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. ते शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले येथून रत्नागिरी जिल्ह्यातील रिळ या आपल्या गावी जाण्यासाठी साई ट्रॅव्हल्सच्या खाजगी आराम बसने (क्रमांक एमएच ०३ सीपी ८८५६) निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी आपला ॲपल कंपनीचा निळ्या रंगाचा ‘आयफोन १५’ स्लीपर सीटवर डाव्या बाजूला ठेवला होता.
शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स संगमेश्वर एसटी बसस्थानक परिसरात पोहोचली असता वैद्य यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी सीटवर ठेवलेला मोबाइल पाहिला असता तो जागेवर मिळून आला नाही. पेण येथे मध्यरात्री दीड वाजता लघुशंकेसाठी उतरल्यानंतर त्यांनी मोबाइल सीटवरच ठेवला होता. बसमधील प्रवाशांकडे चौकशी करूनही मोबाइलचा शोध न लागल्याने, संगमेश्वर परिसरात कोणीतरी अज्ञात इसमाने तो लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
अखेर रवींद्र वैद्य यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी सुमारे ६४ हजार रुपये किमतीच्या वापरत्या आयफोन चोरीप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.