नायरीतील भीषण आगीत दोन घरे भस्मसात; ८० लाखांचे नुकसान
संगमेश्वर : तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन कौलारू घरे आणि त्यातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत नियाज पाटणकर यांचे २८ लाख १२ हजार रुपये, तर जाकीर पाटणकर यांचे ५२ लाख ५० हजार रुपये असे एकूण ८० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे. सुदैवाने ही दोन्ही घरे बंद असल्याने घरात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली.
नायरी मोहल्ल्यातील पाटणकर यांच्या बंद घरांना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. सुरुवातीला लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी दोन्ही घरांना वेढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल होताच जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आगीची तीव्रता लक्षात घेता देवरुख नगरपंचायतीचे अग्निशमन कर्मचारी सचिन साळवी, राज कुंभार आणि आकाश करंडे यांनी तब्बल पाच तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू ठेवले. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन वाहनातील पाणीसाठा अपुरा पडू लागल्याने नदीतून पाणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपामध्ये बिघाड झाल्याने या प्रयत्नांनाही मर्यादा आल्या. अशा परिस्थितीतही जवानांनी हार न मानता आग विझविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी, हेड कॉन्स्टेबल कोलगे, पोलीस कॉन्स्टेबल चौगुले यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांची तत्परता आणि ग्रामस्थांनी दिलेली साथ यामुळे बचावकार्याला हातभार लागला.
आगीची तीव्रता आणि घरांमधील जळणारे साहित्य यामुळे दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर फणसवणे मंडळ अधिकारी अनंत कदम, तलाठी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नियाज पाटणकर यांचे २८ लाख १२ हजार रुपये, तर जाकीर पाटणकर यांचे ५२ लाख ५० हजार रुपये असे एकूण ८० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी अनंत कदम यांनी दिली.
या आगीत दोन कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, घरांसह संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे. एकीकडे या दुर्घटनेमुळे पाटणकर कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असताना, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीतही देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन जवानांनी पाच तासांहून अधिक काळ केलेली मेहनत, संगमेश्वर पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले. संकटाच्या प्रसंगी स्वतःची जबाबदारी ओळखून मदतीसाठी धावून आलेल्या या सर्वांच्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.