महायुतीमध्ये असताना एकमेकांवर टीका नको
उदय सामंत : तटकरेंवरील टीकेशी शिवसेनेचा संबंध नाही
रत्नागिरी : प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु महायुतीमध्ये असताना एकमेकांवर टीका करताना भान राखले पाहिजे. त्यामुळे पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार दळवी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना पक्षाचा संबंध नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, श्रीवर्धन येथे प्रवेश सोहळ्यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी भाषणाच्या ओघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर काही वक्तव्य केले. यासंबंधी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. शिंदे यांनी दळवी यांना समज दिली आहे. माझी देखील महेंद्र दळवी यांची चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे भविष्यात आपण महायुतीमध्ये असताना एकामेकांवर अशा पद्धतीची टीका होऊ नये, हीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी मांडलेली आहे. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आदींनी महायुतीमध्ये काम करतोय असं समजूनच पुढे जाण्याची आवश्यकता आहे.
कर्जत मतदारसंघामध्ये ज्या काही टीका-टिप्पण्या होतायेत, त्या दोन्हीकडनं थांबल्या पाहिजेत. एकीकडनंच थांबवून उपयोग नाही. त्याच्यामुळे तिथे देखील अशा पद्धतीचं काही महायुतीमध्ये जी दरी निर्माण झाली, ती देखील भरणं आवश्यक आहे. महेंद्र दळवी आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये जो काही वाद आहे, तो तात्विक वाद असेल किंवा संघर्ष आहे, तो देखील महायुतीमध्ये असता कामा नये अशी स्पष्ट भूमिका शिंदे यांची आहे.
त्यांच्या टीकेला उत्तर नाही
खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात केलेल्या टीकेसंबंधी मंत्री सामंत म्हणाले की, त्यांच्या टिकेला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. आम्ही टायगर आहोत, हे त्यांनी एक प्रकारे मान्य केलं आहे. युबीटीमध्ये असताना मला चांगलं म्हणत होते. लोकशाहीतला निर्णय घेऊन शिंदेंसोबत गेल्यानंतर मी काही लोकांना वाईट झालो. साडेचार वर्ष त्यांच्याकडून ऐकतोय. आम्ही जनतेच्या आशिर्वादानं महाराष्ट्रातला दोन नंबरचा पक्ष म्हणून उभारी घेतलेली आहे. ऑपरेशन तीन कधी होणार त्याची तारीख, वार, वेळ, सकाळी आहे की दुपारी आहे की मध्यरात्री, हे सगळं लवकर कळेल.