अपघाताने आयुष्याची दिशा बदलली, पण जगण्याची जिद्द हरली नाही
‘आरएचपी फाउंडेशन’तर्फे पॅराप्लेजिक दिव्यांग सुनील खेतले यांना नवी व्हीलचेअर भेट
रत्नागिरी : नियतीच्या एका भीषण आघाताने हसत्या-खेळत्या कुटुंबाची स्वप्ने एका क्षणात विस्कटली, मात्र अशा कठीण प्रसंगातही जगण्याची प्रबळ जिद्द, कुटुंबाची भक्कम साथ आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास माणूस पुन्हा स्वावलंबनाच्या दिशेने भरारी घेऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण खेड तालुक्यातील केळणे-गुमलेवाडी येथील पॅराप्लेजिक दिव्यांग सुनील दत्ताराम खेतले (वय ५०) यांनी घालून दिले आहे. आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या या लढवय्याला आता ‘आरएचपी फाउंडेशन’ने मदतीचा मोलाचा हात दिला असून, संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्या हस्ते सुनील खेतले यांना नवीन आधुनिक व्हीलचेअर भेट देण्यात आली आहे. या अनमोल भेटीमुळे त्यांच्या दैनंदिन हालचाली सुलभ झाल्या असून, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे हास्य फुलले आहे.
सैन्यदलातून निवृत्त झालेले वडील दत्ताराम खेतले (निधन २०२२), गृहिणी आई सुलोचना, मुंबईत वॉचमन म्हणून काम करणारा भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा सुनील यांचा परिवार आहे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सुनील यांनी सुरुवातीला मुंबईतील एका कपड्याच्या दुकानात काम केले आणि २००८ मध्ये गावी परतल्यानंतर ते चिपळूण येथील हमाल पंचायतच्या कार्यालयात कार्यरत होते. २००३ मध्ये अंगणवाडी सेविका सोनल यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या सुनील यांना दिया (इंजिनिअरिंग), भूमी (बी.एस्सी.), आराध्या (नववी) आणि ईशा (सातवी) या चार मुली आहेत. मात्र, २०१४ साली नमनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला एका कंटेनरने जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या कमरेखालील भागातील संवेदना कायमच्या गेल्या.
अपघातानंतर कळंबणी, डेरवण आणि मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया व महिनाभर उपचार घेऊनही त्यांच्या पायातील तसेच नैसर्गिक विधींच्या संवेदना परत आल्या नाहीत. घरी परतल्यानंतर अंथरुणावर खिळून राहिलेल्या सुनील यांना दैनंदिन स्वच्छतेपासून सर्व कामांसाठी पत्नी सोनल यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. एका संस्थेकडून मिळालेल्या जुन्या व्हीलचेअरवर बसण्यासाठीही चार जणांची मदत घ्यावी लागत असल्याने स्वतंत्र हालचाल अशक्य बनली होती. याच काळात त्यांचे मित्र अक्षय आंबरे यांच्या माध्यमातून सुनील यांची ओळख आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याशी झाली. नाकाडे यांनी स्वतः घरी येऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पुनर्वसनासाठी मुंबईतील हाजीअली येथे जाण्याचा मोलाचा सल्ला दिला.
सादिक नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील आणि त्यांच्या पत्नी सोनल यांनी जवळपास चार महिने हाजीअली येथे राहून पुनर्वसन व फिजिओथेरपीचे प्रशिक्षण घेतले. सातत्यपूर्ण सराव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सुनील स्वतःच्या ताकदीने बेडवरून व्हीलचेअरवर आणि व्हीलचेअरवरून बेडवर जाणे, तसेच स्वतः सेल्फ-कॅथेटरायझेशन करणे शिकले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला. मात्र, घरी परतल्यानंतर पूर्वीची व्हीलचेअर पूर्णपणे खराब झाल्याने आणि बाहेर पडण्यासाठी योग्य साधन नसल्याने त्यांना पुन्हा घरातच अडकून पडावे लागले होते. दुसरीकडे, चार मुलींचे शिक्षण आणि संपूर्ण संसाराचा गाडा अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नी सोनल यांच्या तुटपुंज्या पगारावर ओढताना कुटुंबाची मोठी कसरत सुरू होती.
सुनील यांची ही अडचण लक्षात घेऊन आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी संस्थेच्या वतीने त्यांना शरीराला योग्य प्रकारे सूट होणारी नवीन व्हीलचेअर भेट दिली. ही नवीन व्हीलचेअर चालवणे अत्यंत सोपे असल्याने सुनील यांच्या हालचालींना मोठी सुलभता आली आहे. या मदतीबद्दल सुनील खेतले व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सादिक नाकाडे यांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, सुनील खेतले, त्यांच्या पत्नी सोनल, मुली आराध्या व ईशा, तसेच मित्र नितीन घाडगे, शिवाजी कदम आणि शुभम ढेपसे उपस्थित होते.