देवरूखात कबड्डी असोसिएशनच्या सचिवावर गुन्हा दाखल
वैदेही सावंत यांच्या बदनामीप्रकरणी कारवाई
देवरुख : एका तक्रारीतून सुरू झालेल्या वादाने आता कायदेशीर वळण घेतले असून, समाजसेविका वैदेही सुधीर सावंत यांच्या बदनामीप्रकरणी संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचा सचिव अभिजित विजय सुर्वे याच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार अर्जातील आक्षेपार्ह व अश्लील मजकुरामुळे आपले चारित्र्यहनन होऊन आत्मसन्मानाला धक्का पोहोचल्याची तक्रार सौ. सावंत यांनी केली होती. त्यानुसार दि. १३ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७९ आणि ३५६ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला.
चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या वैदेही सावंत या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासह विविध १७ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात सौ. सावंत यांच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, संबंधित तक्रार अर्जातील मजकुरामुळे स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान होऊन सामाजिक प्रतिमा मलीन झाली आणि तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी याचा जाहीर निषेध केला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे आपली बाजू मांडून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. सदर अर्जावर असोसिएशनचा सचिव अभिजित विजय सुर्वे याची स्वाक्षरी असल्याने त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.