उक्षीच्या नवनिर्मिती फाउंडेशनला राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ने सन्मानित
डोंबिवलीत ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखालील उक्षी (ता. जि. रत्नागिरी) येथील ‘नवनिर्मिती फाउंडेशन’ला प्रतिष्ठेच्या ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या बहुआयामी समाजकार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या वतीने डोंबिवली (पूर्व) येथील श्री गणेश संस्थान येथे रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शानदार सोहळ्यात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या शुभहस्ते नवनिर्मिती फाउंडेशनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने सचिव राजेश आंबेकर आणि निलेश जाधव यांनी हा सन्मान स्वीकारला.
नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध लोकपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, रक्तदान आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील गरीब व कष्टकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने संस्थेमार्फत अंबेड बुद्रुक येथे ‘न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल’ चालविण्यात येत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि मोफत शिक्षणाची संधीही दिली जाते.
याशिवाय गरजू ज्येष्ठ नागरिकांना नियमित धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबिरे आणि आपत्तीच्या काळात मदतकार्य करून संस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातून सुरू झालेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला मिळालेली ही राष्ट्रीय पावती असून, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि दात्यांच्या निःस्वार्थ योगदानाचा हा गौरव असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात समाजकार्य करण्याची नवी ऊर्जा मिळाली असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले असून, या राष्ट्रीय सन्मानाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील विविध स्तरांतून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.