संगमेश्वरमध्ये विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
संगमेश्वर :- तालुक्यातील चोरवणे येथे मोठा गवा विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी हा गवा विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने गव्याला विहिरीबाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मृत गव्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. चोरवणे परिसरात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या भागातील अनेक विहिरींना संरक्षण कठडे नसल्याने वन्यप्राणी विहिरीत पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी परिसरातील सर्व विहिरींना तातडीने संरक्षण भिंती किंवा कठडे बांधण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या वेळी परिमंडळ वनाधिकारी संगमेश्वर-देवरुख सागर गोसावी, दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे, आरवलीचे वनरक्षक सूरज तेली, फुणगुसचे वनरक्षक आकाश कडूकर, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे, चोरवणेचे पोलीस पाटील अमित कांबळे आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद अपंडकर उपस्थित होते.
ही संपूर्ण कारवाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.