नाचणे येथे व्याजी पैशाच्या वसुलीतून तरुणाला बेदम मारहाण
रत्नागिरी ः प्रतिनिधी
व्याजी पैशांची वसूली प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 20 जुलै रोजी सकाळी 11.15 ते मंगळवार 21जुलै रोजी मध्यरात्री 2 वा.सुमारास नाचणे येथे घडली आहे.
संदेश संतोष कोरडे (24,मुळ रा.बीड सध्या रा.पनवेल) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात सूरज मदन पाटील (36,मुळ रा.इंदापूर,पूणे सध्या रा.नाचणे,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादीने चैताली जगदीश पाटील हिच्या वडिलांकडून 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. ते मार्च महिन्यात त्याने परत केले होते. त्या रकमेचे 2 लाख 40 हजारांचे व्याज देण्याचे फिर्यादीने मान्य केले होते. दरम्यान, फिर्यादी हा एक्साईज परिक्षा देण्यासाठी नवी मुंबईला गेला असताना ठाणे रेल्वेस्टेशन येथे चैताली पाटील, तिची आई व एक अज्ञात तरुण त्याला भेटले. त्या अज्ञाताने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी माहराण केली होती.
दरम्यान, सोमवारी रात्री फिर्यादी हा नाचणे येथे असताना संशयित संतोष कोरडे व एक अज्ञात त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीला बेदम मारहाण करत दिलेल्या 25 लाखांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी कपडे घालण्यासाठी बेडरुममध्ये गेला असता व रुग्णवाहिकेतून फिर्यादीला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाही संशयित संतोष कोरडेने त्याला पुन्हा शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादीला आज माझ्याकडून सूटला आहेस भविष्यात मला भेटलास तर तूला संपवणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.