थायलंडमधील ‘हीरोज इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप’साठी रत्नागिरीचा अमेय सावंत रवाना
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार खेळाडू
रत्नागिरी (प्रतिनिधी) :
थायलंडमधील पटाया सिटी येथे आयोजित प्रतिष्ठित ‘हीरोज तायक्वांदो इंटरनॅशनल चॅम्पियनशिप’साठी रत्नागिरीचा होतकरू खेळाडू अमेय सावंत थायलंडकडे रवाना होत आहे. ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्यातील ‘एस. आर. के. तायक्वांडो क्लब’चा खेळाडू अमेय अंजली अमोल सावंत २४ जुलै रोजी रवाना होणार आहे.
अमेयने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षापासून तायक्वांडो खेळाची सुरुवात केली. सुरुवातीला यश मिळाले नसले तरी, त्याने जिद्द सोडली नाही. सातत्यपूर्ण सराव आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्याने एकामागून एक यश संपादन केले. अमेयने यापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील पहिला ४थ डॅन ब्लॅक बेल्ट होण्याचा बहुमान पटकावला आहे.
पदक कमाई: त्याने अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत पदके संपादन केली आहेत.
या यशामागे त्याचे आई-वडील, अमोल रमेश सावंत व अंजली अमोल सावंत यांचे प्रोत्साहन आणि एस. आर. के. तायक्वांडो क्लबचे प्रमुख प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या अमेय सावंत याला जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, बिपिन बंदरकर, दीपक पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार तथा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक मिलिंद भागवत यांनीही शुभेच्छा दिल्या.
क्लबचे पदाधिकारी एस. आर. के. क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर तसेच समस्त पालक वर्गाने अमेयला उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रत्नागिरीचा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावणार असल्याने सर्वत्र अभिमानाचे वातावरण आहे.