लोटे आवाशी फाट्यानजीक महामार्गालगत भीषण वणवा
MIDC परिसरात आगीने खळबळ
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आवाशी फाट्यानजीक मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्याची घटना समोर आली असून, या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असून, महामार्गालगत पसरलेल्या धुरामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
आग लागलेल्या ठिकाणाच्या जवळच केमिकल इंडस्ट्री, पेट्रोल पंप आणि भारत गॅसचे गोडाऊन असल्याने आगीच्या संभाव्य विस्ताराबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आगीने अधिक तीव्र स्वरूप धारण केले असते, तर औद्योगिक परिसरात मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली असती.
आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना धुराचा सामना करावा लागला. या घटनेने औद्योगिक क्षेत्रालगतच्या अग्निसुरक्षा आणि संभाव्य धोक्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे का, तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.