दापोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुनाचा मृत्यू
दापोली : तालुक्यातील काळकाई कोंड येथील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका ४० वर्षीय तरुणाचा रुग्णालयात नेल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश मारुती धोत्रे (वय ४०, रा. सकोडी बौद्धवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे या मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास उमेश मारुती धोत्रे हे काळकाई कोंड येथील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून सायंकाळी ७.०० वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची खबर मृत तरुणाचे मामा संतोष शंकर रुके यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ९०/२०२६ नुसार नोंद केली आहे. उमेश धोत्रे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.