‘महाराजस्व समाधान शिबिर’:अशासकीय सदस्यपदी परशुराम ढेकणेंची नियुक्ती
रत्नागिरी :महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्रमांक १’ ची अंमलबजावणी अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अभियानासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील श्री. परशुराम प्रभाकर ढेकणे यांचा समावेश आहे.
या शासन निर्णयानुसार, रत्नागिरी तालुक्यातील तेली आळी येथे राहणारे श्री. परशुराम प्रभाकर ढेकणे यांची या अभियानासाठी अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महसूल विभागाशी संबंधित विविध कामे आणि प्रश्न लोकांच्या दारात सोडवण्याच्या उद्देशाने हे समाधान शिबीर अभियान राबवले जात आहे. या मोहिमेचे कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे आणि नागरिकांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी अशासकीय सदस्यांची मदत घेतली जाणार आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांसाठी शासनाने काही ठराविक कार्यकक्षा निश्चित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यस्तरीय समितीच्या सदस्यांशी समन्वय साधणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तसेच विभागातील शिबिरांचे नियोजन आणि आयोजाबाबत शिबीर अभियानाच्या राज्य समन्वयकांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक राहील. राज्य समन्वयक, समिती सदस्य तसेच जिल्ह्याच्या प्रभारी मंत्र्यांच्या निर्देशानुसार अभियानाच्या यशस्वितेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे देखील या सदस्यांच्या कामाचा भाग असेल.
याशिवाय, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्याशी संपर्क साधून या मोहिमेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अभियानाची अंमलबजावणी अधिक यशस्वी व्हावी यासाठी शासनाला योग्य त्या सूचना देण्याचे कामही हे सदस्य करणार आहेत. रत्नागिरीतील या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील महसूल समाधान शिबिरांच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.