रत्नागिरीत ‘जिल्हास्तर युवा महोत्सव २०२६-२७’चे उद्घाटन; ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात तरुणांचा सहभाग मोलाचा : प्रशांत सातपुते
रत्नागिरी : देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तरुणांचे मन, मनगट आणि मेंदू विकसित होणे ही आजच्या काळाची गरज असून, पंतप्रधानांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात युवकांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तर युवा महोत्सव २०२६-२७’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत…!’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, ‘युवा भारत’चे सम्राट पाटील, प्रमुख पाहुणे मिलिंद विरकर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी, स्पर्धेचे पंच आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रशांत सातपुते म्हणाले की, क्रीडा विभागाच्या माध्यमातून खेळासोबतच तरुणांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारताची संस्कृती, भाषा आणि पेहरावात विविधता असली, तरी ‘विविधतेत एकता’ हेच आपले खरे सामर्थ्य आहे. कोकणाला लाभलेला समृद्ध पारंपरिक वारसा जपत तरुणांनी आपल्या गावखेड्यातील प्रश्न व २०४७ मधील भविष्यातील भारताची संकल्पना आपल्या दर्जेदार कलाकृतींमधून मांडावी, असे आवाहन करत त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयामार्फत जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय अशा चार स्तरांवर दरवर्षी युवा महोत्सव साजरा केला जातो. रत्नागिरीतील या जिल्हास्तरीय महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला आणि कविता लेखन आदी कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘विकसित भारत’ उपक्रमांतर्गत गेल्या महिनाभरापासून राबविलेल्या ‘चॅलेंज ट्रॅक’मधून निवड झालेल्या सुमारे २६ खेळाडूंचे पीपीटीच्या (PPT) माध्यमातून सादरीकरण देखील या महोत्सवात होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सम्राट पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.