बनावट ई-चलन मेसेज पाठवून ६.२९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
दंड भरल्याचा मेसेज पाठवून मोबाईल हॅक ; दोन बँक खात्यांतून रक्कम लंपास
रत्नागिरी: वाहतूक नियमभंगाचा दंड भरल्याचा बनावट ई-चलन मेसेज पाठवून त्यातील लिंक ओपन करण्यास भाग पाडत मोबाईलचा गैरवापर करून तब्बल ६ लाख २९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. बँक ऑफ इंडिया आणि सारस्वत बँकेतील खात्यांमधून ही रक्कम परस्पर काढून घेण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवारी (ता. १४ ) दुपारी अडीच वाजल्यापासून मंगळवारी (ता. १७) नोव्हेंबर सायंकाळी पावणेपाच या कालावधीत शहरातील मांडवी ते चर्मालय या ठिकाणी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तौकीर मकबूल सोलकर (वय ३२, रा. कोहिनूर हेरिटेज, मांडवी रोड, रत्नागिरी) यांना अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्याचा मॅसेज पाठवला. वाहतुकीच्या दंडासंदर्भातील ई-चलन असल्याचे भासवून या मॅसेजमध्ये एक लिंक देण्यात आली होती. दंडाची रक्कम भरण्यासाठी फिर्यादी सोलकर यांनी या लिंकवर क्लिक केले. मात्र, ही लिंक उघडल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अज्ञात संशयिताने फिर्यादी यांच्या बँक ऑफ इंडिया आणि सारस्वत बँकेतील खात्यांमधून एकूण ६ लाख २९ हजार रुपये काढून घेतले. खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोलकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीवरुन पोलिसांनी शहर पोलिसांनी ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस अमंलदार करत आहेत. सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना आता वाहतूक दंडाच्या नावाखाली नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. ई-चलन, बँक खाते अपडेट, वीजबिल थकबाकी, केवायसी अशा वेगवेगळ्या कारणांचे मॅसेज पाठवून नागरिकांना लिंक उघडण्यास प्रवृत्त केले जाते. सरकारी यंत्रणेच्या नावाचा वापर केल्यामुळे अनेकदा नागरिकांचा अशा संदेशांवर विश्वास बसतो. एका लिंकवर क्लिक केल्याने मोबाईलमधील माहितीचा गैरवापर होण्याबरोबरच बँक खात्यातील पैसेही गमावण्याची वेळ येऊ शकते.