रत्नागिरीच्या ‘रेड्स’ अॅपने उलगडले परभणीतील खून प्रकरण
एआय तंत्रज्ञानाची कमाल: अनोळखी मृतदेहाची ओळख पटली; वडील-भावासह दोघे ताब्यात
रत्नागिरी:
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रेड्स’अॅपच्या मदतीने रत्नागिरी पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने नेण्यात यश मिळविले आहे. कवटीच्या रचनेवरून चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करत अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दैठणा पोलीस ठाणे (जि. परभणी) हद्दीतील जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात ९ मे रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दैठणा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटविणे हे परभणी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते.
तपासादरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘RAIDS’ अॅपचा वापर करण्यात आला. या अॅपद्वारे अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून चेहऱ्याची प्रतिमा तयार करण्यात आली. हे पुनर्रचित छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटलांमार्फत माहिती संकलित करण्याबाबत परभणी जिल्हा पोलीस दलास मार्गदर्शन करण्यात आले.
या तांत्रिक प्रक्रियेमुळे अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. मयताचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असे निष्पन्न झाले. पुढील तपासात या खून प्रकरणी मयताचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले व भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोन आरोपींना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.