उमरोलीत ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची यशस्वी सुटका
चिपळूण
तालुक्यातील उमरोली येथील भडवळकरवाडीत एका विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याला (ब्लॅक पँथर) वन विभागाच्या बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. सुमारे ४० फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीतील हे अत्यंत आव्हानात्मक बचावकार्य वन कर्मचाऱ्यांनी कौशल्याने पार पाडले.
मौजे उमरोली येथील भडवळकरवाडीत श्री. विष्णू अर्जुन भडवळकर यांच्या मालकीची एक शेतातील विहीर आहे. ही विहीर लोकवस्तीपासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर असून तिला कोणतीही संरक्षक भिंत किंवा कठडा नव्हता. आज सकाळी याच विहिरीमध्ये एक वर्षाची मादी काळा बिबट्या पडल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश खांडेकर यांनी वनरक्षक श्री. राहुल गुंठे यांना दिली. बातमी समजताच वन विभागात एकच खळबळ उडाली आणि तातडीने सूत्रे हलली.
माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी व विशेष बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या मोहिमेत चिपळूणचे वनपाल श्री. एस. एस. सावंत, कोळकेवाडीचे वनरक्षक श्री. कृष्णा इरमले, रामपूरचे वनरक्षक श्री. राहुल गुंठे, बचाव पथकाचे सदस्य श्री. अजय बडदे, श्री. अथर्व घाग, वाहनचालक श्री. नंदकुमार कदम आणि लिपिक श्री. शहेनशहा कलावंत यांनी सहभाग घेतला.
घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, ती विहीर अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे ४० फूट खोल असलेल्या या विहिरीत पाणी असून, बिबट्या विहिरीतीलच एका दगडावर आश्रय घेऊन बसला होता. विहिरीची खोली, कठीण परिसर आणि वन्यजीवाचा धोका यामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक बनली होती. परंतु, न घाबरता वन पथकाने अत्यंत संयमी आणि नियोजनबद्ध भूमिका घेतली.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या परिस्थितीचा अचूक अंदाज घेत पिंजरा अत्यंत सावधगिरीने विहिरीमध्ये खाली सोडण्यात आला. पिंजरा खाली जाताच बिबट्याने त्याच्यावर उडी मारली. त्यानंतर बचाव पथकाने अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने पिंजऱ्याची हालचाल नियंत्रित करत बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. अखेर वन पथकाच्या या धाडसी प्रयत्नांना यश आले आणि बिबट्याला कोणतीही दुखापत न होऊ देता सुखरूप बाहेर काढण्यात आले.
विहिरीबाहेर आणल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक पाहणी केली. हा अंदाजे एक वर्ष वयाचा मादी काळा बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला तातडीने वन विभागाच्या शासकीय वाहनातून चिपळूण येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चिकित्सालयात हलवण्यात आले. तिथे त्याची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत आणि निरोगी असल्याची खात्री पटल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला त्याच्या सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही यशस्वी मोहीम कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.) श्रीमती श्रीलक्ष्मी, रत्नागिरी (चिपळूण)च्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच या संपूर्ण संकटकाळात ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश खांडेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले, ज्याबद्दल वन विभागाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. वन्यजीवांचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वन विभाग नेहमीच तत्पर असून, नागरिकांनी अशाप्रकरणी सतर्क राहून स्वतः प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.