गोळवली येथे कंटेनरची ट्रकला जोरदार धडक; दोघे जखमी
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर संगमेश्वर तालुक्यातील गोळवली टप्पा येथे भरधाव कंटेनरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही चालक जखमी झाले आहेत. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील पेठ किल्ला, कुरणवाडी परिसरात राहणारे ट्रक चालक सचिन प्रभाकर गोलतकर (वय ५२) हे रविवारी रात्री आपल्या ताब्यातील टाटा ट्रक (क्र. एमएच ०८ एपी ५८४०) घेऊन रत्नागिरीहून ठाण्याच्या दिशेने निघाले होते. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक महामार्गावरील गोळवली टप्पा येथे आला असता, गोव्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच ४६ सीयू ५५३९) वरील चालक शिवकुमार नरेंद्र दुबे (वय ३६, रा. टिकर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने गोलतकर यांच्या ट्रकला पाठीमागून जोरदार ठोकर दिली.
हा अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या धडकेत ट्रक चालक सचिन गोलतकर यांच्यासह कंटेनर चालक शिवकुमार दुबे हे दोघेही जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
या अपघाताप्रकरणी ट्रक चालक सचिन गोलतकर यांनी सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक शिवकुमार दुबे याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.