सह्याद्री हिल मॅरेथॉनमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या धावपटूंची चमकदार कामगिरी!
विनायक पावसकर यांना द्वितीय, वैदेही कदम व राधा बसणकर यांना तृतीय क्रमांक; पंचकन्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला यश
रत्नागिरी : सह्याद्री हिल मॅरेथॉनमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉन (KCM) च्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या स्पर्धेत विनायक पावसकर यांनी १० किलोमीटरचे अंतर ५१ मिनिटे २८ सेकंदांत पूर्ण करून ३६ ते ४५ वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. वैदेही सावंत यांनी १० किलोमीटरचे अंतर १ तास १२ मिनिटांत पूर्ण करून ४६ ते ५५ वयोगटात तृतीय क्रमांक मिळवला. तर राधा बसणकर यांनी २१ किलोमीटरचे (हाफ मॅरेथॉन) अंतर ३ तास १२ मिनिटांत पूर्ण करून आपल्या वयोगटात तृतीय क्रमांक पटकावला.
या यशामागे कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सुरू झालेला नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, टीम कोकण कोस्टलच्या ‘पंचकन्या’ सलग १२० रविवार मोफत प्रॅक्टिस रनचे आयोजन करत आहेत. रेस डायरेक्टर मानसी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमातून अनेक महिला धावपटूंना नियमित धावण्याची प्रेरणा, मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ मिळत आहे.
राधा बसणकर, अंकिता पाटकर, केतकी लेले आणि स्नेहल कलाल यांचाही पंचकन्या टीममध्ये सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये धावण्याची आवड निर्माण होण्याबरोबरच स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासही वाढत आहे.
प्रत्येक रविवारच्या प्रॅक्टिस रनमध्ये धावपटूंना वेग, योग्य पेसिंग, स्टॅमिना, श्वासोच्छ्वासाचे नियोजन आणि धावण्याचे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले जाते. केवळ जास्त अंतर धावणे महत्त्वाचे नसून, स्वतःच्या क्षमतेचे विश्लेषण करून वेळेत सुधारणा कशी करता येईल, यावरही भर दिला जातो.
कोकण कोस्टल मॅरेथॉनपासून सुरू झालेला हा प्रवास आता विविध मॅरेथॉन स्पर्धांमधील पोडियमपर्यंत पोहोचत आहे. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सातत्य यांच्या जोरावर कोणत्याही वयात धावण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
३ जानेवारी २०२७ रोजी चौथ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे. हाफ मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी आणि ५ किमी अशा तीन प्रकारांत धावपटूंना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२६ असून, जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.