वालोपे येथे तरुणाची डोक्यात जांभा दगड घालून हत्या
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. झोलाई माऊली पार्क समोरील एका टपरीच्या मागे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेमुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नवनाथ कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा वांगी – सांगली येथील रहिवासी होता. वालोपे येथे कोकण रेल्वे आरपीएफ कर्मचारी असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे तो वास्तव्यास होता. लोटे येथील एका खासगी कंपनीत तो नोकरीला होता. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, मंगळवारी पहाटे वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागे त्याची हत्या झाल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस, पोलीस निरीक्षक आवारे, पोलीस उप निरीक्षक श्री. निकम, श्रीमती सावंत, ए. एस. आय. अमोल यादव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी होते. हत्येमागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.