कोकण-सातारा जोडणारा केबलस्टेड ब्रिज सज्ज!
रत्नागिरी :- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी केबल स्टेड ब्रिजचे काम पूर्ण झाले असून, आता हा पूल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल १७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पूल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात या पुलाची संकल्पना पुढे आली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला विशेष गती दिली. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. मुंबईतील वरळी सी लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात उभारण्यात आलेला हा पहिलाच अशा स्वरूपाचा केबल स्टेड ब्रिज असल्याचे सांगितले जात आहे.या पुलाची लांबी ५४० मीटर, तर रुंदी १४ मीटर आहे. पुलाच्या मध्यभागी पर्यटकांसाठी तब्बल ४३ मीटर उंचीची आकर्षक व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्टची सुविधा उपलब्ध असणार असून, दोन्ही बाजूंनी जिन्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या गॅलरीतून कोयना धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. टी अँड टी कंपनीने अवघ्या तीन वर्षांत या पुलाचे काम पूर्ण केले आहे.
गेल्या मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाची पाहणी करून पुलाची वाहन चाचणीही घेतली होती. गणेशोत्सवाच्या काळात काही दिवसांसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या मार्गाचा नागरिकांना चांगला उपयोग झाला. या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरकडे जाण्याचे अंतर सुमारे ५० किलोमीटरने कमी होणार आहे. तापोळा ते कोकणातील गाढवली आहिर परिसराला जोडणाऱ्या या पुलामुळे कोयना खोऱ्यातील दुर्गम भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात कोयना जलाशयातून बार्जच्या साहाय्याने करावा लागणारा धोकादायक प्रवास टाळता येणार असून, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.