भरधाव मोटारसायकलच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू
पिंपळी बुद्रुक येथील घटना; बेदरकार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी):
चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ५६ वर्षीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या चालकाविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक कृष्णा राणे (वय ५६, रा. कोळकेवाडी जोशीवाडी, ता. चिपळूण) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात आरोपी संजय श्रीकांत पवार (वय ४०, रा. गणेशपुरवाडी नांदिवसे, ता. चिपळूण) हा स्वतः जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत अशोक राणे (वय २७) यांचे वडील अशोक राणे हे आपल्या एच.एफ. डीलक्स मोटारसायकलने (गाडी क्र. MH 08 AZ 0996) जात असताना, विरुद्ध बाजूने येणाऱ्या संजय पवार याने आपल्या ताब्यातील एच.एफ. डीलक्स मोटारसायकल (गाडी क्र. MH 08 AV 9603) रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवून राणे यांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिली.
या अपघातात अशोक राणे गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी संकेत राणे यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी आरोपी संजय श्रीकांत पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६, १२५, १२५ (ब) तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १३७/२०२६) दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.