गुहागर, लांज्यातील दोन वृद्धांना ७५ लाखांचा गंडा
रत्नागिरी: सीबीआय आणि पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर भामट्यांनी जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ७५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. गुहागर तालुक्यातील ६८ वर्षीय वृद्धाची १५ लाखांची, तर लांजा तालुक्यातील ७८ वर्षीय वृद्धेची ६० लाख रुपयांची फसवणूक केली.
गुहागर येथील प्रकरणात विजय सहदेव गडदे (वय ६८, मूळ रा. कीर्तनवाडी, गुहागर, सध्या मुलुंड, मुंबई) यांना २७ सप्टेंबरला संशयित संदीप दिवाण याने कॉल केला. बंगळूर येथील सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या नावे कॅनरा बँकेतील खात्यातून तीन कोटींची उलाढाल झाल्याचे भासवले. तक्रार दाखल असल्याची खोटी प्रत पाठवून तपासासाठी २५ लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. अटकेची धमकी देत १४ ऑक्टोबरला त्यांच्या स्टेट बँकेतील खात्यातील १५ लाखांचा धनादेश मुलुंड शाखेत जमा करण्यास भाग पाडले.
पोलिस अधिकारी असल्याचे भासवून वृद्धेला व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलद्वारे अटकेची व बदनामीची धमकी देत ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लांजा येथे उघडकीस आला. ती महिला लांजा शेवरवाडी येथे राहते. ३१ ऑक्टोबरला सकाळी ९.३० ते ५ नोव्हेंबर २०२६ सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. यामध्ये संशयित सुशांत पिसे (पूर्ण नाव, गाव, पत्ता नाही) असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने वृद्ध महिलेला व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलद्वारे पोलिस गणवेश परिधान करून आपण नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या आधारकार्डचा वापर करून मुंबई येथील कॅनरा बँकेत खाते उघडले असून, अब्दुल रहमान नावाची व्यक्ती विविध संघटनांकडून पैसे गोळा करून तुमच्या नावावरील या खात्यात जमा करत आहे, असे सांगितले. या व्यवहारातून १० टक्के कमिशन दिले जात असल्यामुळे तुम्हाला अटक केली जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर संशयित आरोपीने वृद्धेला घाबरवून तिच्याकडून एसबीआय बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे पुणे येथील पुनित ट्रेडर्सच्या बँक ऑफ इंडिया खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. संशयिताच्या सांगण्यावरून संबंधित महिलेने वेळोवेळी रक्कम हस्तांतरित केली. याप्रकरणी ७ नोव्हेंबरला सायबर पोलिस ठाण्यात सुशांत पिसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.