आंबा घाट लूटकांडातील इनोव्हा मालकाच्या ताब्यात
पाच लाखांच्या बंधपत्रावर मालकाला ताबा!
रत्नागिरी
आंबा घाटात थार आणि इनोव्हा गाड्यांचा वापर करून व्यावसायिकाला जबरदस्तीने वाहनात कोंबून चाकूचा धाक दाखवत मारहाण व रोकड लुटल्याच्या खळबळजनक प्रकरणातील जप्त इनोव्हा कारचा अंतरिम ताबा तिच्या नोंदणीकृत मालकाला देण्याचे आदेश रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहेत. पाच लाख रुपयांचे बंधपत्र आणि विविध कठोर अटींच्या अधीन राहून हा ताबा देण्यात येणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी २८ ऑक्टोबर रोजी हा आदेश दिला.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटात ८ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. कोल्हापूर येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बोलेरो वाहनातून वेतोशी येथून म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दख्खन परिसरात त्यांना अडविण्यात आले. ‘पांडुरंग’ असे लिहिलेली थार आणि ‘भारत सरकार’ असा लोगो असलेल्या इनोव्हा कारमधून काही जण उतरले. त्यांनी दळवी यांना जबरदस्तीने वाहनात कोंबून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोकड लुटल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर देवरुख पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत पाच आरोपींना ताब्यात घेतले होते. पुढील तपासात या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शागिद गणी बलबले (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याच्यासह सर्व नऊ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी इनोव्हा कार जप्त केली होती. या वाहनाचा अंतरिम ताबा मिळावा, यासाठी नोंदणीकृत मालक विजयकुमार तंगराज नाडर यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जावर सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्याने वाहन सोडण्यास विरोध दर्शविला. वाहनाचा रंग किंवा स्वरूप बदलले जाऊ शकते, तसेच त्याचा अन्य गुन्ह्यांसाठी वापर होण्याची शक्यता असल्याची हरकत पोलिसांकडून घेण्यात आली होती. मात्र, वाहनासंदर्भातील तपास पूर्ण झाला असून, ते पोलीस ठाण्याबाहेर उघड्यावर ठेवल्याने ऊन-पावसामुळे त्याची झीज व नुकसान होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने नमूद केले. वाहन जप्त अवस्थेत पोलीस ठाण्यात ठेवून कोणताही अतिरिक्त उद्देश साध्य होणार नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. वाहनाची सद्यस्थिती पंचनामा आणि छायाचित्रांच्या माध्यमातून नोंदविता येत असल्याने ते मालकाच्या ताब्यात दिल्यास अभियोग पक्षाच्या हिताला बाधा पोहोचणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यानुसार, पाच लाख रुपयांचे बंधपत्र सादर केल्यानंतर इनोव्हा कार खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनाचा वापर कोणत्याही गुन्ह्यासाठी करता येणार नाही, त्याची विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही, तृतीय पक्षाचा हक्क निर्माण करता येणार नाही आणि वाहनाचा रंग बदलता येणार नाही, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. न्यायालयाने मागणी केल्यास वाहन हजर करण्याचे बंधनही मालकावर राहणार आहे. दरम्यान, वाहन ताब्यात देण्यापूर्वी देवरुख पोलिसांनी त्याचा सविस्तर पंचनामा करून छायाचित्रे काढण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आंबा घाटातील लूटप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा अंतरिम ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.