कोकणनगर येथून मतीमंद मुलाचे अपहरण
रत्नागिरी, ः शहरातील कोकणनगर, मजगांव रोड येथील मतीमंद मुलाला घराच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी सोडले असता त्याचे अपहरण झाले. त्याला पळवून नेल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम प्रविण खाकोडिया (वय १९, रा. अलिशान कॉर्नर, कोकणनगर, रत्नागिरी) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) रात्री आठच्या सुमारास कोकणनगर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. गंगा प्रविण खाकोडिया (वय ३८, रा. अलिशान कॉर्नर, कोकणनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) यांचा मतीमंद मुलगा हा चिडचिड करत असल्याने फिर्यादी यांनी त्याला घराच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी सोडले. थोड्या वेळाने तो दिसला नाही म्हणून नातेवाईकांच्या मदतीने परिसरात, रेल्वेस्टेशन शोध घेतला असता सापडला नाही. या प्रकरणी गंगा खाकोडिया यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी अपहरण झाल्या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.