रत्नागिरीचे कापड व्यापारी ‘पापा ओसवाल’ कोलकात्यात सापडले!
बेपत्ता प्रकरणाला मोठे वळण; एटीएममधून पैसे काढल्यानंतर लोकेशन ट्रेस
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ यांच्या बेपत्ता किंवा कथित अपहरणाच्या प्रकरणाला एक मोठे आणि सुखद वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयीरीतीने बेपत्ता असलेले पापा ओसवाल हे थेट पश्चिम बंगालमधील कोलकात्यात सुखरूप असल्याचे समोर आले आहे. ते कोलकात्यात सापडल्याची माहिती समजताच रत्नागिरीतील त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पापा ओसवाल अचानकपणे बेपत्ता झाल्याने रत्नागिरी शहर आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती. ते बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांची आणि पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. नेमके ते कुठे गेलेत किंवा त्यांना कुणी नेले आहे का, याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. या गुन्ह्याचा किंवा बेपत्ता प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तपासाला तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मोठे यश मिळाले.
प्राप्त माहितीनुसार, पापा ओसवाल यांनी एका एटीएमधून पैसे काढल्यानंतर त्यांचे तांत्रिक लोकेशन ट्रेस करण्यात आले. या ट्रेसिंगच्या आधारे ते कोलकात्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी तातडीने हालचाली केल्या. कोलकात्यातील स्थानिक व्यापारी मंडळी आणि ओळखीच्या लोकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. कोलकात्यामध्ये ते सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रत्नागिरीतील त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य परतले असून, सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
पापा ओसवाल नेमक्या कोणत्या कारणामुळे किंवा कशामुळे रत्नागिरीतून कोलकात्यापर्यंत पोहोचले आणि या प्रकरणामागे नेमके काय कारण आहे, याबाबतचे सविस्तर कारण पोलीस तपासात लवकरच समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ते सुखरूप सापडल्यामुळे रत्नागिरीच्या व्यापारी वर्गातील चिंतेचे वातावरण दूर झाले आहे.