सात्विणगाव येथे दारूच्या नशेत तरुणाची आत्महत्या
खेड: सात्विणगाव बौद्धवाडी येथील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मनोज महेंद्र मोहिते असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ७.४५ च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज मोहिते हा १५ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यावर तो बडबड करत होता. त्यानंतर तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला. सायंकाळी ६ वाजता त्याचे वडील घरी परतले तेव्हाही मनोजची बडबड सुरू होती. रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास मनोजच्या मुलाला वडिलांकडे जायचे असल्याने त्याची पत्नी मंजिरी खोलीकडे गेली. तिने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता मनोज भिंतीला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिने तत्काळ ही बाब सासऱ्यांना सांगितली.
वडिलांनी तातडीने खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. छताच्या लोखंडी बारला दोरीच्या सहाय्याने मनोजने गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने दोरी कापून खाली उतरवले आणि उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला १६ जुलै रोजी पहाटे मयत घोषित केले. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील ओंकार नायनाक यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.