दर्जाहीन काम करणाऱ्या महावितरणच्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकणार – खा. तटकरे
रत्नागिरी
चक्रीवादळापासून जिल्ह्याच्या किनारी भागातील विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे ४५० कोटींचे काम सुरू आहे. मात्र या कामात ठेकेदाराकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे दिशा समितीच्या आढावा बैठकीत दिसून आले. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन दर्जाहीन काम करणाऱ्या महावितरणच्या कंत्राटदारांना थेट काळ्या यादीत टाकण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. तसेच शासकीय शिस्त आणि नियम डावलणाऱ्या व बैठकांना अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांवक कारवाई करून उशिरा येणार्या अधिकाऱ्यांसाठी यापुढे थेट दरवाजे बंद करा, असा कडक दमही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी उपस्थित होते.
श्री. तटकरे म्हणाले, दिशा समितीची बैठक खासदार नारायण राणे स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा, वीज पुरवठा आणि जनसामान्यांशी निगडित असलेल्या विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्ते सुरक्षा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण ८ टक्क्यांनी घटले आहे. मात्र, आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपासची किमान एक लेन गणपती उत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परशुराम घाटातील दरड कोसळण्याच्या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. दापोलीतील हरणे बंदर अत्याधुनिक करण्याच्या कामाची गती संथ आहे. केवळ २० टक्केच हे काम झाले असून त्याची गती वाढविण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाला दिले.
जागेअभावी प्रलंबित राहिलेल्या गुहागर ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन नियमांनुसार ‘उभ्या’ (व्हर्टिकल) इमारतीचे बांधकाम करण्याचा व्यावहारिक पर्याय सुचवून हे काम मार्गी लावण्याचे निर्देश दिले गेले. जिल्ह्यातील बीएसएनएल आणि जिओच्या ४-जी व ५-जी नेटवर्कचा विस्तार वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी वीज जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्याचे तटकरे यांनी दिल्या. आंबेत पुलाला बार्स (बोटी) धडकल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित बोट मालकावर कडक कारवाई करण्याचे आणि पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.