मराठी पत्रकार परिषदेतर्फे पत्रकारांना छत्री वाटप
रत्नागिरी:
पत्रकारांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील सर्व सभासद पत्रकारांसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन परिषदेतर्फे सर्व सभासदांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
हा छत्री वाटप कार्यक्रम शनिवारी दिनांक १८ जुलै रोजी माळनाका येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आला होता. बदलत्या हवामानात आणि भरपावसातही पत्रकार आपली कर्तव्यभावना जपून ग्राउंड झीरोवरून बातम्या पोहोचवण्याचे काम करत असतात. अशा वेळी त्यांना फिल्डवर काम करताना सुलभता व्हावी, या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरीतील मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजू यांनी या छत्र्या उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम साकार झाला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणी व सर्व सभासद पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते . पत्रकारितेच्या क्षेत्रातील बांधिलकी आणि आपुलकी वाढवणाऱ्या या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती लाभली होती.

